Monday, October 26, 2009

एक ठिकाण

कोल्हापूर पासून ४५-५० किमी. अंतरावरच एक ठिकाण. अगदी छोटसं गाव. फार-फार तर २५०० लोकसंखेच. (हा आपला अंदाज) हिरव्यागार झाडीत वसलेलं. लाल मातीची सुंदर दिसणारी घरं. प्रत्येक घरासमोर अंगण, समोर झाडीच कुंपण. त्यावर वाळत घातलेले कपडे. सगळंच कसं चित्रासारखं. सुंदर निसर्गचित्र. रस्ता डांबरी पण नावालाच, खड्ड्यांनी भरलेला. या गावात एका टोकाला राम मंदिर आहे. फार प्राचीन असं म्हणतात. सध्या एक खाजगी आश्रम, श्रद्धास्थान, सर्वांसाठी विना मोबदला खुलं असणारं ठिकाण. वरून पाहिलं कि हिरव्यागार झाडीनं झाकलेले उंच डोंगर. जश्या पायऱ्या उतरून जावं तसा पाण्याचा खळखलाट ऐकू येतो. थोडंस खाली गेलं कि मग दिसतात, ओबड धोबड दगड आणि नितळ, स्वच्छ , निर्मळ पाणी. मन प्रसन्न करणारं. त्यावर पाय ठेवला तर ती पातळ काच फुटून जाईल असं वाटणारं. संपूर्ण दगड खोदून ध्यानाला तयार केलेली जागा. अंधारलेली. (हे प्राचीन असावं, आता कोणी त्याचा वापर करत नसावं, हा हि अंदाज) असे तीन दगड. एका कोपऱ्यात शेवाळलेल्या दगडांच्या गुहेत शंकराची पिंड. तिथं गेलं कि वरून पाणी ठिबकत असतं. तर दुसरीकडे दोन मोठ्या दगडांच्या चिमटीतून पडणारं पाणी, थंडगार. पूर्ण भिजून जावं, असं वाटणारं. स्वच्छ पाणी आणि त्याच्या सहवासात गुळगुळीत झालेले काळे दगड. पुन्हा चित्रासारखं. तसा आम्हाला तिथं कुठ आश्रम किंवा राम मंदिर दिसलं नाही. पण त्याची फिकीर नव्हती. एकाच नजरेत सामावणारं ते ठिकाण, 'पर्यटन स्थळ' नसल्यानं अजून तरी खूप छान, स्वच्छ, मनाला स्पर्श करणारं आहे. खऱ्या निसर्गाचं खरं दर्शन घडवणारं.

1 comment:

  1. jagatali changali sukhe phar swastat / agadi phukatat miltat ase mhantat . Tasech zale na he!
    Dusari gosht ekunach blog chhan lihitayes ani niyamitpane. Snehal.

    ReplyDelete

About Me

My photo
short tempered,talkative.love to watch tv.