Friday, January 29, 2010

फिर मिले सूर मेरा तुम्हारा

१९८८ साली पंडितजींच्या आवाजाने (योग्य विशेषण सुचत नाही) सुरु होणारं 'मिले सूर मेरा तुम्हारा' हे गाणं न ऐकलेली किंवा न गुणगुणलेली व्यक्ती भारतात न भेटणं जरा अवघडच वाटत. आजही ते गाणं तितकंच श्रवणीय आहे, 'गोड' आहे. त्यात दिसणारे सगळे कलाकार ,गायक ,वादक आणि सगळी प्रेक्षणीय दृश्ये याविषयी अधिक न बोललेलंच बरं. तर सांगायची गोष्ट अशी की 'झूम' ने 'फिर मिले सूर मेरा तुम्हारा' नावानं याची सुधारित आवृत्ती २६ जानेवारीला बाजारात आणली. याही गाण्याची (की अल्बमची) सुरवात पंडितजींइतक्याच महान कलाकाराने होते, ए.आर. रेहमान. तो एका वाद्याने (नाव माहित नाही) गाण्याची अप्रतिम सुरवात करतो. यात वादकांची एक पिढी दिसते. पंडित अमजद अली खान अमान आणि अयान दिसतात, पंडित शिव कुमार शर्मा आणि राहुल शर्मा, एल. सुब्रमण्यम-कविता कृष्णमुर्ती आणि त्यांची मुले, अनुष्का शंकर, ब्यांडवाले लुई का कोणीतरी, सोबत शंकर-एहसान-लॉय, शिवमणी ( इथं त्याला वाजवताना बघणं अधिक सुंदर)असे बेहतर वादक शान, सोनू निगम आणि कमी काळात यशस्वी गायिका म्हणून नावाजलेली गोड आवाजाची श्रेया घोशाल आणि दक्षिणेकडचे दोघे (हे दोघेही अपरिचित) असे अनेक गायकही पडद्यावर दिसतात. कलाकारांचं म्हणाल तर अमिताभ-अभिषेक- ऐश्वर्या-प्रियांका- शिल्पा-आमीर- सलमान- शाहरुख-रणबीर-दीपिका-जुही अशी हिंदी कलाकारांची फौजच यावेळीही आहे.याशिवाय सूर्या(तेलेगु 'गझनी' फेम), मामुट्टी, विक्रम('अपराजित' फेम), महेशबाबू (पोकीरी फेम- मूळचा 'वॉनटेड') (दक्षिणेचे कलाकार), गुरदीप मान, प्रसेनजीत आणि ऋतुपर्णो घोष, गुजराती गायक की अभिनेता ठाऊक नाही, अशी दमदार प्रादेशिक कलाकारांची आघाडी आहेच. मराठीसाठी आपले अतुल आणि सोनाली कुलकर्णी ('नटरंग' मधली नव्हे बरं का!) शोभूनच दिसतात. यांच्याशिवाय सायना नेहवाल, पी गोपीचंद , मेरीकोम, अभिनव,सुशीलकुमार, विजयांदरअसे खेळाडूही पडद्यावर दिसतात. दोन्हीतला फरक सांगण्यापेक्षा किंवा अधिक उत्तम काय याची चर्चा करण्यापेक्षा दोन्हीमुळे भारताचं भाषेतलं, पेहराव्यातलं, संगीतातलं वैविध्य लक्षात येतं, इतकं स्वतःला 'भारतीय' म्हणवणाऱ्या माझ्यासारखीला पुरेसं आहे.

Wednesday, January 13, 2010

जाहिरात

कोल्हापुरात महानगरपालिकेच्या जवळ मोठया बोर्डवरची जाहिरात: 'कोल्हापुरातील पाहिलं बहुभाषिक सायंदैनिक, कधी कधी वाकेन, पण मोडणार नाही, हा मंत्र युवकांना शिकवणारं, आजची बातमी आजचं देणारं, महाराष्ट्र वैभव.' या दैनिकाच्या शंभराव्या अंकाचं प्रकाशन नुकतंच मनोहर जोशी यांच्या हस्ते झालं. यावेळी कोल्हापूरातले शिवसेनेचे दोन आमदारही उपस्थित होते.

Tuesday, December 29, 2009

किम की ड्यूक

अर्धविराम. खरतरं थोडा लांबलेला अर्धविराम. असो. कधीपासून कोल्हापुरात झालेल्या आशियायी चित्रपट महोत्सवात पाहिलेल्या चित्रपटांविषयी लिहायचं होतं. '३ आयर्न' आणि 'द बो', हे दोन कोरियन चित्रपट. किम कि ड्युक नावाच्या दिग्दर्शकाचे. मी काही चित्रपट समीक्षक नव्हे पण समर नखाते यांच्यामुळे चित्रपट बघण्याची जी नवी सुधारित दृष्टी मिळालेली आहे त्यामुळे आवडलेलं का आवडलं आणि जे पाहिलं त्यात वेगळं काय वाटलं हे नक्कीच सांगता येतं. त्यामुळंच हे दोन्ही चित्रपट वेगळे वाटले, अर्थात भारतीय चित्रपटांच्या संदर्भात. तर, या दोन्ही चित्रपटात, अगदी सहज मोजता येतील इतके कमी संवाद, आवश्यक असतील तिथेच संवाद. ('द बो' मधील नायिका संपूर्ण चित्रपटात एकदाही बोलत नाही, मूक नसताना. ) पार्श्वसंगीत ही असेच मोजके. पात्रांची संख्याही खूप कमी आवश्यक तितकीच.(३ आयर्न मध्ये तिघेच जण आहेत.) पण तरीही सिनेमा कुठेच संथ वाटत नाही कारण प्रचंड बोलके सीन आणि दमदार अभिनय विशेषतः मुद्राभिनय दाद देण्यासारखा ('द बो' मधील म्हातारा). आता हि कमाल कलाकारांची ही असू शकते पण चित्रपट ज्या प्रकारे पुढे जातो त्यावरून दिग्दर्शकाची ताकदही लक्षात येते. 'द बो' मध्ये ७० वर्षांच्या म्हाता-याला १६ वर्षांच्या मुलीशी लग्न करायचे असते (हिंदी 'निशब्द'शी तुलना करण्याचं धाडस आणि मूर्खपणा केला नाही.) ही कथा ज्या सशक्तपणे पडद्यावर मांडलीय ती सांगण्यापेक्षा पहिलेलं अधिक उत्तम, हे एक उदाहरण. कलाकारांची फौज, अनावश्यक गाणी, कर्कश पार्श्वसंगीत असे हिंदी चित्रपट पाहिल्यानंतर, असे चित्रपट नक्कीच वेगळे वाटले आणि मांडणीच्या शैलीमुळे आवडलेही.

Sunday, November 22, 2009

शाळा

इयत्ता पाचवी. आम्ही विद्या मंदिर सोडून हायस्कूलमध्ये गेलो, म्हणजे आता आपण कोणीतरी मोठे झालो असं वाटायला लागलं. काय बदललं होतं ते अजून काहीचं कळलं नव्हतं. तर आम्ही, म्हणजे माझा धाकटा भाऊ, माझ्या शेजारची माझ्याच वयाची आणखी एक मुलगी असे तिघे जण, थोड्या भीतीनं, थोड्या उत्साहात जुने-नवे मित्र-मैत्रिणी भेटणार या आनंदात हायस्कूलमध्ये दाखल झालो. पहिल्या काही दिवसांच्या गोंधळानंतर, मी चांगलीच 'सेट' झाले. आमचं हायस्कूल मुला-मुलींचं असलं, तरी आमचा 'पाचवी अ' वर्ग फक्त मुलींचा होता, कारण आम्हाला माहित नव्हतं, आणि आम्हाला ते जाणूनही घ्यायचं नव्हतं. कारण मुलं नसल्यामुळं आम्हाला हवं तसं आमच्या वर्गात राहता येणार होतं.आम्हा ५२ मुलींचं राज्य.

आम्ही आमच्या वर्गात, आठ तासांच्या वेळापत्रकात चांगलेच रुळलो होतो. मधल्या जेवणाच्या सुट्टीत आम्ही ५२ जणी मिळून जेवायचो. अनेक गोष्टी, ज्या आम्ही घरी बोलू शकत नव्हतो, त्या बोलायचो. कुणी डब्बा आणला नसेल तर प्रत्येकजण एक-दोन घास एका डब्ब्याच्या झाकणात गोळा करून तिला द्यायचो.सगळ्या स्पर्धांमध्ये कुणी ना कुणी भाग घ्यायचं, आणि सगळा वर्ग तिच्या सोबत असायचा. माझ्यासारखीला वेगवेगळे खेळ शिकवले जायचे तर माझ्यासारख्या काहीजणी अनेकींना अभ्यासात मदत करायच्या. पाचवी ब, क आणि ड तल्या मुलींना आमचा हेवा वाटायचा. काही कळत नसल्यामुळे असेल आमच्या असूया नव्हती, अजून.

आम्हाला खरचं काही कळत नव्हतं. एक मुलगी, दिसायला गोरी, थोडी जाड, गोल चेहऱ्याची, आईला मदत म्हणून भाजी विकून शाळेला येणारी, म्हणून आम्ही तिला अभ्यासात नेहमी मदत करायचो. एक दिवस जेवणाच्या वेळी ती रडायला लागली. कारण विचारल्या नंतर ती नाक डोळे पुसत म्हणाली,''ते, मराठीचे ........ सर चांगलं न्हायीती. माझा सारखा हात धरत्यात. मला न्हाय आवडतं.आईला सांगितलं तर ती सराचं डोस्कचं फोडील. कसातरीच हाय त्यो''. खरंतर मला 'कसातरी' म्हणजे कसा हेच कळलं नव्हतं. पण माझी मैत्रीण त्या सरांमूळं रडली हेच माझ्यासाठी काय ते महत्वाच होतं. आमच्यासाठी ही खूप मोठी समस्या होती. सगळ्यांनी खूप विचार केला. पण काय सुचणार होतं त्या वयात? आम्ही आमच्या एका आवडत्या सरांना 'एखादे शिक्षक बदलून पाहिजे असतील तर काय करायचं असतं' असं विचारलं. त्यांना वाटलं आम्ही सहजचं विचारतोय.ते म्हणाले सगळ्यांनी मिळून मुख्याध्यापकांकडे जाऊन सांगायचं. झालं. आमच ठरलं. खूप दिवस न घालवता आम्ही दुपारी जेवणाच्या सुट्टीत ऑफिसमध्ये गेलो. शिपायानं विचारल्यावर सांगितलं एका सरांविषयी तक्रार करायला आलो आहोत म्हणून. पाचवीतल्या चिमुरड्या तक्रार घेऊन आलेल्या पाहून त्या शिपायानं आम्हाला शेळ्या हुसकावून लावतात तसं तिथून हाकलून लावलं. तोपर्यंत आमचा मराठीच्या 'त्या' सरांकडे बघायचा दृष्टीकोनचं बदलून गेला होता. आता आम्हाला 'ते' सर आमचे एक नंबरचे शत्रू वाटू लागले होते. मग त्यांना हरप्रकारे त्रास कसा देता येईल याचा विचार सुरु झाला. मराठीचे धड्यातले, व्याकरणाचे खूप प्रश्न विचारणं, त्यांना अगदी वैताग येईल असे प्रश्न विचारणं, त्यांच्या कपड्यांवर शाईचे डाग पडण्याचे प्रयत्न करणं, ते वर्गात येण्यापूर्वी त्यांच्या खुर्चीवर खाजवणारी काउसकुल्ली ठेवणं, खुर्चीच्या फटीत काटे ठेवणं ,त्यांना शिकवताना मध्ये-मध्ये त्रास देणं असे अनेक प्रकार सुरु केले. हे असं कित्येक दिवस सुरु होतं. आता या प्रकरणाचा शेवट काय झाला? जे आठवतंय त्यानुसार आमच्या आवडत्या सरांना आमची अडचण सांगितली, आणि त्यांनी आम्हाला चांगलंच खडसाऊन आमचं कसं चुकतंय ते सांगितलं. ते आम्हाला पटलं कि नाही हे महत्वाच नव्हतं, ते आमच्या आवडत्या सरांनी सांगितलं होतं ते महत्वाचं होतं. मग अभ्यासात आम्ही इतके बुडून गेलो कि 'त्या' सगळ्या गोष्टी हळूहळू डोक्यातून निघून गेल्या.

Thursday, November 19, 2009

सौंदर्य

एक संध्याकाळ. पावसानं भरलेल्या काळ्या ढगांनी दाटून आलेली. हवेत गारवा. माणसांनी , खड्ड्यांनी भरून गेलेले रस्ते, तरी त्याचा त्रास होऊ न देणारी, एक सावळी संध्याकाळ. मोठया टपोऱ्या थेंबांनी न्हाऊन गेलेली, एक संध्याकाळ. एक रात्र. कोसळणाऱ्या पावसाची, सोसाटयाच्या वाऱ्याची, बाकी सगळी शांतता. भीती वाटायला लावणारी. संपूर्ण भिजून, थिजून गेलेली, एक रात्र. एक सकाळ. रात्रभर पडलेल्या पावसानंतर, नाहणं झाल्यानंतर सुंदर दिसणाऱ्या नववधुसारखी. वाळलेलं, भिजलेलं गवत. त्यावर पडलेली सूर्याची सोनेरी किरणं. किरणांमुळं गवतावरचे चमकणारे पाण्याचे थेंब. म्हणजे जणू चांदीचं नक्षीकाम असलेली पिवळसर साडी नेसलेली एक सकाळ. सूर्याच्या किरणांमध्ये प्रसन्न, निर्मळ, स्वच्छ वाटणारी, एक सकाळ. दररोज दिसणाऱ्या निसर्गाची ही विविध रूपं. भावलेली. कुणीतरी म्हणालं होतं, 'निसर्ग म्हणजे सौंदर्य'. अनुभवायला मिळालं. पुन्हा एकदा.

Wednesday, November 11, 2009

लंपन भेटला

संध्याकाळची वेळ. अवेळी पडत असलेला पाऊस, रस्त्यांवरचे खड्डे, खड्ड्यात साठलेले गढूळ पाणी, वाहनांची गर्दी, वाहनानंमुळे अंगावर उडत असलेला चिखल, चिखलामुळे खराब होत असलेले कपडे. कटकट . आता बस stop वर थांबायचं, बसची वाट बघायची, बस मधली गर्दी, धक्काबुक्की... असं बरंच काही-बाही आठवायला लागलं. वैताग वाटायला लागला. कपाळावर नकळत आठ्यांचं जालं पसरायला लागलं. बस stop थोड्या चढतीवर होता. थोड्या अंतरावर शाळा होती. बस येईपर्यंत येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पाहण्याखेरीज दुसरं काही काम नव्हतं. इतक्यात तो दिसला. पाहता क्षणी याला कुठंतरी भेटलीय असं वाटलं. कोण बरं हा? मग नीट निरखून पाहिलं त्याला. दहा बारा वर्षांचा तो सावळासा चिमुरडा. अंगानं बारीकच. डोक्यावर अगदी बारीक केस. पाठीवर भलं मोठं दप्तर. त्याच्या ओझ्यानं बिचारा चांगलाच वाकला होता. सायकल चालवत होता, म्हणजे तसा प्रयत्न करत होता. एकाच पायानं एका बाजूचं प्याडल दोन तीनदा मारत तोल सावरत, बाहेर काढलेली जीभ दातात थोडीशी चावत, जोर लावून, कशीबशी त्यानं सायकलवर ढेंग टाकली. सायकल थोडीशी लडबडली. पण त्यानं सावरलं.चेहरा निरागस. पण तो थोडासा गोंधळलेला दिसत होता, वाहनांची गर्दी असल्यानं असेल कदाचित. आपले सगळे मित्र पुढे जाताहेत, आपण मात्र मागे पडलो असंही वाटत असेल त्याला कदाचित. थोडा पुढे आल्यानंतर त्याची माझी नजरानजर झाली. मी त्याला पाहून ओळख असल्यासारखी हसले. तो अजूनच गोंधळला. आपण ओळखतो का हिला, असा त्याला प्रश्न पडला असावा, ते त्याला पडलेल्या आठीवरून मला कळलं. हो. मी भेटले होते त्याला! प्रकाश नारायण संतांच्या 'पंखा', 'झुंबर' आणि 'वनवास' मध्ये. लंपन. वाचत असताना लंपनचं जे चित्र मनात तयार झालं होतं तेच जणू मूर्त होऊन समोर आलं होतं. लंपनपेक्षा थोडासा मोठा असेल कदाचित पण मला माझा लंपन भेटला. ओळखीचं कुणी भेटलं कि जो आनंद होतो तोच झाला, आणि सगळा वैताग पळून गेला. सगळ्या आठ्या गायब...

Monday, November 9, 2009

मराठी भाषा टिकणार...

मराठी भाषा टिकणार...मराठी माणूस टिकणार... यासाठी काय करायचं? सोप्पं आहे... दुसरी कुठलीही भाषा महाराष्ट्रात बोलू द्यायची नाही। मराठी माणसाव्यतिरिक्त इतर कुणाचचं कौतुक करायचं नाही, आपलं म्हणायचं नाही. म्हणालं तर तुम्हाला मराठीचा अभिमान नाही. हिंदी सिनेमे बघायचे नाहीत, हिंदी मालिका बघायच्या नाहीत,हिंदी गाणी ऐकायची नाहीत, 'जय हो' म्हणत खूष व्हायचं नाही, रवींद्रनाथ टागोरांबद्दल अभिमान वाटू द्यायचा नाही, भगत सिंग मराठी नव्हते ना मग त्यांचा विचार करायचा नाही, आशा-लता यांनी मराठी किती गाणी गायली यावरून त्यांना थोर म्हणायचे, कोण गुलझार, कोण ए. आर. रहमान, कोण पी टी उषा, कोण बिंद्रा, कोण किरण बेदी, आम्हाला फक्त सचिन आणि सुनील माहित आहेत, ते खेळतात तेच काय ते क्रिकेट, कशाला ताज महालचं कौतुक करायचं, कुठलं हळेबिड आणि कुठलं हंपी? मराठी भाषा टिकणार...मराठी माणूस टिकणार.... आम्ही मराठी किती बोलतो, कसं बोलतो, आम्ही मराठी किती वाचतो, शाळेत मराठीच्या नावानं काय शिकवलं जातं, कसं शिकवलं जातं, याकडे लक्ष द्यायचं नाही, याचा विचार आपण करायचं नाही. याचा विचार केला आधी बाळासाहेब ठाकरेंनी, आणि आता तो करत आहेत राज ठाकरे... .मनसे...दिलसे...हाथसे...लाथसे...

About Me

My photo
short tempered,talkative.love to watch tv.