Sunday, November 22, 2009

शाळा

इयत्ता पाचवी. आम्ही विद्या मंदिर सोडून हायस्कूलमध्ये गेलो, म्हणजे आता आपण कोणीतरी मोठे झालो असं वाटायला लागलं. काय बदललं होतं ते अजून काहीचं कळलं नव्हतं. तर आम्ही, म्हणजे माझा धाकटा भाऊ, माझ्या शेजारची माझ्याच वयाची आणखी एक मुलगी असे तिघे जण, थोड्या भीतीनं, थोड्या उत्साहात जुने-नवे मित्र-मैत्रिणी भेटणार या आनंदात हायस्कूलमध्ये दाखल झालो. पहिल्या काही दिवसांच्या गोंधळानंतर, मी चांगलीच 'सेट' झाले. आमचं हायस्कूल मुला-मुलींचं असलं, तरी आमचा 'पाचवी अ' वर्ग फक्त मुलींचा होता, कारण आम्हाला माहित नव्हतं, आणि आम्हाला ते जाणूनही घ्यायचं नव्हतं. कारण मुलं नसल्यामुळं आम्हाला हवं तसं आमच्या वर्गात राहता येणार होतं.आम्हा ५२ मुलींचं राज्य.

आम्ही आमच्या वर्गात, आठ तासांच्या वेळापत्रकात चांगलेच रुळलो होतो. मधल्या जेवणाच्या सुट्टीत आम्ही ५२ जणी मिळून जेवायचो. अनेक गोष्टी, ज्या आम्ही घरी बोलू शकत नव्हतो, त्या बोलायचो. कुणी डब्बा आणला नसेल तर प्रत्येकजण एक-दोन घास एका डब्ब्याच्या झाकणात गोळा करून तिला द्यायचो.सगळ्या स्पर्धांमध्ये कुणी ना कुणी भाग घ्यायचं, आणि सगळा वर्ग तिच्या सोबत असायचा. माझ्यासारखीला वेगवेगळे खेळ शिकवले जायचे तर माझ्यासारख्या काहीजणी अनेकींना अभ्यासात मदत करायच्या. पाचवी ब, क आणि ड तल्या मुलींना आमचा हेवा वाटायचा. काही कळत नसल्यामुळे असेल आमच्या असूया नव्हती, अजून.

आम्हाला खरचं काही कळत नव्हतं. एक मुलगी, दिसायला गोरी, थोडी जाड, गोल चेहऱ्याची, आईला मदत म्हणून भाजी विकून शाळेला येणारी, म्हणून आम्ही तिला अभ्यासात नेहमी मदत करायचो. एक दिवस जेवणाच्या वेळी ती रडायला लागली. कारण विचारल्या नंतर ती नाक डोळे पुसत म्हणाली,''ते, मराठीचे ........ सर चांगलं न्हायीती. माझा सारखा हात धरत्यात. मला न्हाय आवडतं.आईला सांगितलं तर ती सराचं डोस्कचं फोडील. कसातरीच हाय त्यो''. खरंतर मला 'कसातरी' म्हणजे कसा हेच कळलं नव्हतं. पण माझी मैत्रीण त्या सरांमूळं रडली हेच माझ्यासाठी काय ते महत्वाच होतं. आमच्यासाठी ही खूप मोठी समस्या होती. सगळ्यांनी खूप विचार केला. पण काय सुचणार होतं त्या वयात? आम्ही आमच्या एका आवडत्या सरांना 'एखादे शिक्षक बदलून पाहिजे असतील तर काय करायचं असतं' असं विचारलं. त्यांना वाटलं आम्ही सहजचं विचारतोय.ते म्हणाले सगळ्यांनी मिळून मुख्याध्यापकांकडे जाऊन सांगायचं. झालं. आमच ठरलं. खूप दिवस न घालवता आम्ही दुपारी जेवणाच्या सुट्टीत ऑफिसमध्ये गेलो. शिपायानं विचारल्यावर सांगितलं एका सरांविषयी तक्रार करायला आलो आहोत म्हणून. पाचवीतल्या चिमुरड्या तक्रार घेऊन आलेल्या पाहून त्या शिपायानं आम्हाला शेळ्या हुसकावून लावतात तसं तिथून हाकलून लावलं. तोपर्यंत आमचा मराठीच्या 'त्या' सरांकडे बघायचा दृष्टीकोनचं बदलून गेला होता. आता आम्हाला 'ते' सर आमचे एक नंबरचे शत्रू वाटू लागले होते. मग त्यांना हरप्रकारे त्रास कसा देता येईल याचा विचार सुरु झाला. मराठीचे धड्यातले, व्याकरणाचे खूप प्रश्न विचारणं, त्यांना अगदी वैताग येईल असे प्रश्न विचारणं, त्यांच्या कपड्यांवर शाईचे डाग पडण्याचे प्रयत्न करणं, ते वर्गात येण्यापूर्वी त्यांच्या खुर्चीवर खाजवणारी काउसकुल्ली ठेवणं, खुर्चीच्या फटीत काटे ठेवणं ,त्यांना शिकवताना मध्ये-मध्ये त्रास देणं असे अनेक प्रकार सुरु केले. हे असं कित्येक दिवस सुरु होतं. आता या प्रकरणाचा शेवट काय झाला? जे आठवतंय त्यानुसार आमच्या आवडत्या सरांना आमची अडचण सांगितली, आणि त्यांनी आम्हाला चांगलंच खडसाऊन आमचं कसं चुकतंय ते सांगितलं. ते आम्हाला पटलं कि नाही हे महत्वाच नव्हतं, ते आमच्या आवडत्या सरांनी सांगितलं होतं ते महत्वाचं होतं. मग अभ्यासात आम्ही इतके बुडून गेलो कि 'त्या' सगळ्या गोष्टी हळूहळू डोक्यातून निघून गेल्या.

Thursday, November 19, 2009

सौंदर्य

एक संध्याकाळ. पावसानं भरलेल्या काळ्या ढगांनी दाटून आलेली. हवेत गारवा. माणसांनी , खड्ड्यांनी भरून गेलेले रस्ते, तरी त्याचा त्रास होऊ न देणारी, एक सावळी संध्याकाळ. मोठया टपोऱ्या थेंबांनी न्हाऊन गेलेली, एक संध्याकाळ. एक रात्र. कोसळणाऱ्या पावसाची, सोसाटयाच्या वाऱ्याची, बाकी सगळी शांतता. भीती वाटायला लावणारी. संपूर्ण भिजून, थिजून गेलेली, एक रात्र. एक सकाळ. रात्रभर पडलेल्या पावसानंतर, नाहणं झाल्यानंतर सुंदर दिसणाऱ्या नववधुसारखी. वाळलेलं, भिजलेलं गवत. त्यावर पडलेली सूर्याची सोनेरी किरणं. किरणांमुळं गवतावरचे चमकणारे पाण्याचे थेंब. म्हणजे जणू चांदीचं नक्षीकाम असलेली पिवळसर साडी नेसलेली एक सकाळ. सूर्याच्या किरणांमध्ये प्रसन्न, निर्मळ, स्वच्छ वाटणारी, एक सकाळ. दररोज दिसणाऱ्या निसर्गाची ही विविध रूपं. भावलेली. कुणीतरी म्हणालं होतं, 'निसर्ग म्हणजे सौंदर्य'. अनुभवायला मिळालं. पुन्हा एकदा.

Wednesday, November 11, 2009

लंपन भेटला

संध्याकाळची वेळ. अवेळी पडत असलेला पाऊस, रस्त्यांवरचे खड्डे, खड्ड्यात साठलेले गढूळ पाणी, वाहनांची गर्दी, वाहनानंमुळे अंगावर उडत असलेला चिखल, चिखलामुळे खराब होत असलेले कपडे. कटकट . आता बस stop वर थांबायचं, बसची वाट बघायची, बस मधली गर्दी, धक्काबुक्की... असं बरंच काही-बाही आठवायला लागलं. वैताग वाटायला लागला. कपाळावर नकळत आठ्यांचं जालं पसरायला लागलं. बस stop थोड्या चढतीवर होता. थोड्या अंतरावर शाळा होती. बस येईपर्यंत येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पाहण्याखेरीज दुसरं काही काम नव्हतं. इतक्यात तो दिसला. पाहता क्षणी याला कुठंतरी भेटलीय असं वाटलं. कोण बरं हा? मग नीट निरखून पाहिलं त्याला. दहा बारा वर्षांचा तो सावळासा चिमुरडा. अंगानं बारीकच. डोक्यावर अगदी बारीक केस. पाठीवर भलं मोठं दप्तर. त्याच्या ओझ्यानं बिचारा चांगलाच वाकला होता. सायकल चालवत होता, म्हणजे तसा प्रयत्न करत होता. एकाच पायानं एका बाजूचं प्याडल दोन तीनदा मारत तोल सावरत, बाहेर काढलेली जीभ दातात थोडीशी चावत, जोर लावून, कशीबशी त्यानं सायकलवर ढेंग टाकली. सायकल थोडीशी लडबडली. पण त्यानं सावरलं.चेहरा निरागस. पण तो थोडासा गोंधळलेला दिसत होता, वाहनांची गर्दी असल्यानं असेल कदाचित. आपले सगळे मित्र पुढे जाताहेत, आपण मात्र मागे पडलो असंही वाटत असेल त्याला कदाचित. थोडा पुढे आल्यानंतर त्याची माझी नजरानजर झाली. मी त्याला पाहून ओळख असल्यासारखी हसले. तो अजूनच गोंधळला. आपण ओळखतो का हिला, असा त्याला प्रश्न पडला असावा, ते त्याला पडलेल्या आठीवरून मला कळलं. हो. मी भेटले होते त्याला! प्रकाश नारायण संतांच्या 'पंखा', 'झुंबर' आणि 'वनवास' मध्ये. लंपन. वाचत असताना लंपनचं जे चित्र मनात तयार झालं होतं तेच जणू मूर्त होऊन समोर आलं होतं. लंपनपेक्षा थोडासा मोठा असेल कदाचित पण मला माझा लंपन भेटला. ओळखीचं कुणी भेटलं कि जो आनंद होतो तोच झाला, आणि सगळा वैताग पळून गेला. सगळ्या आठ्या गायब...

Monday, November 9, 2009

मराठी भाषा टिकणार...

मराठी भाषा टिकणार...मराठी माणूस टिकणार... यासाठी काय करायचं? सोप्पं आहे... दुसरी कुठलीही भाषा महाराष्ट्रात बोलू द्यायची नाही। मराठी माणसाव्यतिरिक्त इतर कुणाचचं कौतुक करायचं नाही, आपलं म्हणायचं नाही. म्हणालं तर तुम्हाला मराठीचा अभिमान नाही. हिंदी सिनेमे बघायचे नाहीत, हिंदी मालिका बघायच्या नाहीत,हिंदी गाणी ऐकायची नाहीत, 'जय हो' म्हणत खूष व्हायचं नाही, रवींद्रनाथ टागोरांबद्दल अभिमान वाटू द्यायचा नाही, भगत सिंग मराठी नव्हते ना मग त्यांचा विचार करायचा नाही, आशा-लता यांनी मराठी किती गाणी गायली यावरून त्यांना थोर म्हणायचे, कोण गुलझार, कोण ए. आर. रहमान, कोण पी टी उषा, कोण बिंद्रा, कोण किरण बेदी, आम्हाला फक्त सचिन आणि सुनील माहित आहेत, ते खेळतात तेच काय ते क्रिकेट, कशाला ताज महालचं कौतुक करायचं, कुठलं हळेबिड आणि कुठलं हंपी? मराठी भाषा टिकणार...मराठी माणूस टिकणार.... आम्ही मराठी किती बोलतो, कसं बोलतो, आम्ही मराठी किती वाचतो, शाळेत मराठीच्या नावानं काय शिकवलं जातं, कसं शिकवलं जातं, याकडे लक्ष द्यायचं नाही, याचा विचार आपण करायचं नाही. याचा विचार केला आधी बाळासाहेब ठाकरेंनी, आणि आता तो करत आहेत राज ठाकरे... .मनसे...दिलसे...हाथसे...लाथसे...

Friday, November 6, 2009

college life

कॉलेजचे दिवस म्हणजे धमाल, कॉलेजचे दिवस म्हणजे सोनेरी दिवस, कॉलेजचे आयुष्य म्हणजे फुलपाखरांचे दिवस....असं बरंच काही-बाही ऐकलं होतं. फार उत्साहानं जेव्हा कॉलेजमध्ये गेले, पण घेतलं science, मग इंग्रजीतून अभ्यास, एक-एक तासाची सलग लेक्चर, दोन-दोन तास चालणारी practicals, मुला-मुलींचे ग्रुप, चांगले मार्क मिळवायचं टेन्शन.... या सगळ्या दडपणात फुलपाखरू कधी कोमेजून गेलं, कळलंच नाही. शिस्तीचे असले तरीही शाळेचे दिवस चांगले असं वाटायला लागलं. मग कोणीतरी म्हणालं, अकरावी-बारावी म्हणजे असंच. खर कॉलेज म्हणजे पुढची तीन वर्षे. मग पुन्हा कॉलेजच्या सुंदर दिवसांची स्वप्नं पडायला लागली. पण नंतर सगळी गणितंच चुकली. काही कारणांमुळे पदवीच शिक्षण मुक्त विद्यापीठातून पूर्ण करावं लागलं. तिथं फक्त रविवारीच कॉलेज. तिथलं सगळचं वेगळं. लग्न झालेल्या, शिक्षण अर्धवट सोडलेल्या, बढतीसाठी नोकरी करत-करत शिकणाऱ्या बायका आणि मुली. तिथले दिवस म्हणजे 'वासरात लंगडी गाय शहाणी'. तेही दिवस गेले. नंतर post-graduation पुण्यात. आधी जे ठरवलं होतं त्या पेक्षा काहीतरी वेगळंच. घरात आजपर्यंत कुणी ही ऐकलं नव्हतं असं क्षेत्र, journalism चं. इकडे मात्र कॉलेजच्या दिवसांविषयी जे ऐकलं होतं ते सगळं अनुभवायला मिळालं. एक भन्नाट ग्रुप, कॅन्टीन मधला चहा वर चहा, कधी फालतू गप्पा तर कधी सिरिअस चर्चा, लायब्ररीतला time-pass, नाटकं-सिनेमे, पुरस्कार सोहळे असे काही-बाही कार्यक्रम, अफलातून gathering ,लहान-मोठ्या ट्रिप्स,आमचे वाद, आमचे संवाद, हसून हसून, तर कधी भांडणातून डोळ्यात आलेलं पाणी, परीक्षेसाठी नोट्सचा गोंधळ.....सगळंच ... .पुन्हा सिद्ध करणारं..college life खरचं सुंदर असतं...परत न येणारं .

Thursday, November 5, 2009

काही जपलेली नाती

बदलत्या जीवन शैलीनुसार रक्ताच्या नात्यांचं स्वरूप बदललंय, तिथं ओळखीच्या नात्यांची काय कथा? पण अशा परिस्थितीतही काही ठिकाणी मात्र अशी नाती जपली जातात, त्यापैकी एक घर. या घरात, सकाळी कामाच्या गडबडीत येणाऱ्या 'दुधवाल्या मामांना' आठवणीनं चहा दिला जातो. त्याचं खरं नाव काहीही असो त्या घरासाठी ते 'मामा' चं असतात, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. ते ही अगदी आपलेपणानं त्या घरात येऊन पेपर वाचून चहा घेऊनच जातात. कधी तरी चहाला उशीर झाला तर ते स्वतः न लाजता चहा मागतात. आजही त्या घरात पोस्टमनला चहा-पाणी आवर्जून विचारलं जातं. दिवाळीला 'दिवाळीच्या पोच' सोबत थोडा फराळही दिला जातो. सरकारी सर्व्हेसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरात बोलावून आपलेपणानं माहिती दिली जाते, सोबत चहा असतोच. सध्याच्या निवडणुकीसाठी ओळखपत्र काढायला आलेल्या अधिकाऱ्यांनी त्या घरात बसूनच इतर घरांचीही माहिती घेतली. दारावर येणाऱ्या सेल्समनला पाणी विचारून काहीही घेणार नाही, त्यामुळं काहीही दाखवू नकोस, असं शांतपणे प्रसंगी चिडून सांगितलं जातं. महिन्याला येणारा 'केबलवाला' आला कि पंधरा-वीस मिनिटं बसून बोलूनच जातो. सकाळी येणाऱ्या 'पेपरवाल्या पोऱ्याशी' एका हास्याचं नातं. शिवाय सोसायटीतला 'भाजीवाला मामू' आणि 'गिरणवाला काका' हि सुद्धा, खरी नावं माहित नसलेली, पण जपली गेलेली नाती.या नात्यांसोबत शेजारधर्म आहेच. शेजारी असणारी पाच कुटुंबं म्हणजे जणू घरचेच सदस्य. दिवसातून एक चहा तरी सोबत होतोच, कोणत्या तरी एका घरात. भाज्या खुडणं, धान्य निवडणं, घरच्या गप्पा-गोष्टी, चेष्टा-विनोद, रुसवे-फुगवे, वाद-भांडणं हेही आहेच, त्या जपलेल्या नात्यांमध्ये. सगळं काही गोडगोड नसतं. वादाचे, कडवटपणाचेही काही प्रसंग असतात पण दुर्मिळ होत असलेली ही नाती इथं मात्र जपलेली आहेत. आताच्या काळातला कदाचित हा मूर्खपणा असू शकेल.

Wednesday, November 4, 2009

प्रवास

बस नंबर २१७५. भवानी मंडप ते शिवाजी विद्यापीठ. वेळ सकाळी ७.४०. प्रवासाचा एकूण वेळ २० मिनिटं. सगळे प्रवासी ठरलेलेच. बसचा ड्रायव्हरही ठरलेलाच. पन्नाशीच्या पुढचा. दाढीचे लालसर झालेले केस, मिशा नाहीतच, डोक्यावर काळ्या रंगाची विणलेली गोल टोपी, समोरच्या दातांमध्ये फट, हसरा आणि शांत चेहरा. कंडक्टर ठरलेला नसतो. तर या ड्रायव्हरमुळे सकाळची वीस मिनिटं अगदी मजेत जातात. तो त्याच्या आवडीची जुनी गाणी बसमध्ये लावतो. त्या गाण्यांमुळे सकाळची ती वीस मिनिटं अगदी संगीतमय होऊन जातात. दिवसाची सुरवात प्रसन्नपणे होते. रफी, मुकेश, किशोर, लता-आशा यांची सोबत असलेली एक आनंदयात्राच जणू. आजची सकाळ तर 'रफी स्पेशल' होती. 'शराबी आंखे', 'मेरी मेहबूबा', 'एहसान तेरा', 'बदन पे सितारे' अशी एक से एक सही गाणी ऐकल्यानंतर बस मधून उतरावं, असं तरी वाटेल का कुणाला?

Monday, November 2, 2009

वेगळं हिंदी

हिंदी मालिकांविषयी अनेकदा अनेकजण अनेक गोष्टी बोलत असतात. अशांपैकी मी हि एक. एकता कपूर संपली, बालाजीचा आशीर्वाद किमान आता तरी तिला मिळेनासा झाला आहे, त्यामुळे ती त्रस्त असेलच. जाऊदे, त्याची चर्चा इथे नको. तर, एकता संपली असली तरी सास- बहु संपल्या नाहीत, पण त्याचं स्वरूप बदललं आहे. म्हणजे त्यांचे कट कारस्थान अजून ही सुरु आहेच, ते कसे संपेल, त्यावरच तर टीवीवाल्यांचे TRP शिजतात. तर, आता सास-बहु फक्त शहरातल्या आणि गुजराती किंवा बंगाली राहिल्या नाहीत. आता त्या ग्रामीण (पण श्रीमंतच) भागातल्या आहेत. त्या आहेत बिहारी, हरयाणवी, राजस्तानी आणि मराठी सुद्धा. त्यामुळे आता खास भोजपुरी, हरयाणवी, मराठी टच असलेली हिंदी ऐकायला मिळते. त्यामुळे कानाला थोडं बरं वाटत. झी वरच्या 'अगले जनम मोहे बिटीयाही कीजो' मालिकेत भोजपुरी style चं हिंदी ऐकायला मिळतं. तिथल्या प्रथांविषयी, आणि बाकी मसाला तोच. पण सगळेच कलाकार भोजपुरी हिंदी मस्त बोलतात. 'ना आणा इस देस मेरी लाडो' स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधातली हरयानवी style ची मालिका. यात 'अम्माजी'चं काम करणारी अभिनेत्री भारीच (हरयानवी) हिंदी बोलते. 'क्योंकी' ची छुट्टी करणाऱ्या 'बालिका वधू' मधलं राजस्तानी बिंद-बिन्दनि वेगळं वाटतं. यातली 'दादीसा' उत्तमच. 'छोटी बहु' मधले बाउजी जेव्हा 'अपराधी को उचित दंड मिलना स्वाभाविक हैं, अतः मैं अपना कार्य अवश्यहि करुंगा' असे म्हणत रागावले तरी कानात साखर घोळल्यासारखंच वाटतं. या मालिका खूप भन्नाट आहेत किंवा अर्थपूर्ण आहेत असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. या मालिकांमधून वेगळ ( रुळलेलं नव्हे ) हिंदी ऐकायला मिळतं इतकच वाटतं. आणि ते हि बरोबरच असेल या बद्दलही शंका आहेच. पण तरीही....

About Me

My photo
short tempered,talkative.love to watch tv.