Tuesday, December 29, 2009

किम की ड्यूक

अर्धविराम. खरतरं थोडा लांबलेला अर्धविराम. असो. कधीपासून कोल्हापुरात झालेल्या आशियायी चित्रपट महोत्सवात पाहिलेल्या चित्रपटांविषयी लिहायचं होतं. '३ आयर्न' आणि 'द बो', हे दोन कोरियन चित्रपट. किम कि ड्युक नावाच्या दिग्दर्शकाचे. मी काही चित्रपट समीक्षक नव्हे पण समर नखाते यांच्यामुळे चित्रपट बघण्याची जी नवी सुधारित दृष्टी मिळालेली आहे त्यामुळे आवडलेलं का आवडलं आणि जे पाहिलं त्यात वेगळं काय वाटलं हे नक्कीच सांगता येतं. त्यामुळंच हे दोन्ही चित्रपट वेगळे वाटले, अर्थात भारतीय चित्रपटांच्या संदर्भात. तर, या दोन्ही चित्रपटात, अगदी सहज मोजता येतील इतके कमी संवाद, आवश्यक असतील तिथेच संवाद. ('द बो' मधील नायिका संपूर्ण चित्रपटात एकदाही बोलत नाही, मूक नसताना. ) पार्श्वसंगीत ही असेच मोजके. पात्रांची संख्याही खूप कमी आवश्यक तितकीच.(३ आयर्न मध्ये तिघेच जण आहेत.) पण तरीही सिनेमा कुठेच संथ वाटत नाही कारण प्रचंड बोलके सीन आणि दमदार अभिनय विशेषतः मुद्राभिनय दाद देण्यासारखा ('द बो' मधील म्हातारा). आता हि कमाल कलाकारांची ही असू शकते पण चित्रपट ज्या प्रकारे पुढे जातो त्यावरून दिग्दर्शकाची ताकदही लक्षात येते. 'द बो' मध्ये ७० वर्षांच्या म्हाता-याला १६ वर्षांच्या मुलीशी लग्न करायचे असते (हिंदी 'निशब्द'शी तुलना करण्याचं धाडस आणि मूर्खपणा केला नाही.) ही कथा ज्या सशक्तपणे पडद्यावर मांडलीय ती सांगण्यापेक्षा पहिलेलं अधिक उत्तम, हे एक उदाहरण. कलाकारांची फौज, अनावश्यक गाणी, कर्कश पार्श्वसंगीत असे हिंदी चित्रपट पाहिल्यानंतर, असे चित्रपट नक्कीच वेगळे वाटले आणि मांडणीच्या शैलीमुळे आवडलेही.

Sunday, November 22, 2009

शाळा

इयत्ता पाचवी. आम्ही विद्या मंदिर सोडून हायस्कूलमध्ये गेलो, म्हणजे आता आपण कोणीतरी मोठे झालो असं वाटायला लागलं. काय बदललं होतं ते अजून काहीचं कळलं नव्हतं. तर आम्ही, म्हणजे माझा धाकटा भाऊ, माझ्या शेजारची माझ्याच वयाची आणखी एक मुलगी असे तिघे जण, थोड्या भीतीनं, थोड्या उत्साहात जुने-नवे मित्र-मैत्रिणी भेटणार या आनंदात हायस्कूलमध्ये दाखल झालो. पहिल्या काही दिवसांच्या गोंधळानंतर, मी चांगलीच 'सेट' झाले. आमचं हायस्कूल मुला-मुलींचं असलं, तरी आमचा 'पाचवी अ' वर्ग फक्त मुलींचा होता, कारण आम्हाला माहित नव्हतं, आणि आम्हाला ते जाणूनही घ्यायचं नव्हतं. कारण मुलं नसल्यामुळं आम्हाला हवं तसं आमच्या वर्गात राहता येणार होतं.आम्हा ५२ मुलींचं राज्य.

आम्ही आमच्या वर्गात, आठ तासांच्या वेळापत्रकात चांगलेच रुळलो होतो. मधल्या जेवणाच्या सुट्टीत आम्ही ५२ जणी मिळून जेवायचो. अनेक गोष्टी, ज्या आम्ही घरी बोलू शकत नव्हतो, त्या बोलायचो. कुणी डब्बा आणला नसेल तर प्रत्येकजण एक-दोन घास एका डब्ब्याच्या झाकणात गोळा करून तिला द्यायचो.सगळ्या स्पर्धांमध्ये कुणी ना कुणी भाग घ्यायचं, आणि सगळा वर्ग तिच्या सोबत असायचा. माझ्यासारखीला वेगवेगळे खेळ शिकवले जायचे तर माझ्यासारख्या काहीजणी अनेकींना अभ्यासात मदत करायच्या. पाचवी ब, क आणि ड तल्या मुलींना आमचा हेवा वाटायचा. काही कळत नसल्यामुळे असेल आमच्या असूया नव्हती, अजून.

आम्हाला खरचं काही कळत नव्हतं. एक मुलगी, दिसायला गोरी, थोडी जाड, गोल चेहऱ्याची, आईला मदत म्हणून भाजी विकून शाळेला येणारी, म्हणून आम्ही तिला अभ्यासात नेहमी मदत करायचो. एक दिवस जेवणाच्या वेळी ती रडायला लागली. कारण विचारल्या नंतर ती नाक डोळे पुसत म्हणाली,''ते, मराठीचे ........ सर चांगलं न्हायीती. माझा सारखा हात धरत्यात. मला न्हाय आवडतं.आईला सांगितलं तर ती सराचं डोस्कचं फोडील. कसातरीच हाय त्यो''. खरंतर मला 'कसातरी' म्हणजे कसा हेच कळलं नव्हतं. पण माझी मैत्रीण त्या सरांमूळं रडली हेच माझ्यासाठी काय ते महत्वाच होतं. आमच्यासाठी ही खूप मोठी समस्या होती. सगळ्यांनी खूप विचार केला. पण काय सुचणार होतं त्या वयात? आम्ही आमच्या एका आवडत्या सरांना 'एखादे शिक्षक बदलून पाहिजे असतील तर काय करायचं असतं' असं विचारलं. त्यांना वाटलं आम्ही सहजचं विचारतोय.ते म्हणाले सगळ्यांनी मिळून मुख्याध्यापकांकडे जाऊन सांगायचं. झालं. आमच ठरलं. खूप दिवस न घालवता आम्ही दुपारी जेवणाच्या सुट्टीत ऑफिसमध्ये गेलो. शिपायानं विचारल्यावर सांगितलं एका सरांविषयी तक्रार करायला आलो आहोत म्हणून. पाचवीतल्या चिमुरड्या तक्रार घेऊन आलेल्या पाहून त्या शिपायानं आम्हाला शेळ्या हुसकावून लावतात तसं तिथून हाकलून लावलं. तोपर्यंत आमचा मराठीच्या 'त्या' सरांकडे बघायचा दृष्टीकोनचं बदलून गेला होता. आता आम्हाला 'ते' सर आमचे एक नंबरचे शत्रू वाटू लागले होते. मग त्यांना हरप्रकारे त्रास कसा देता येईल याचा विचार सुरु झाला. मराठीचे धड्यातले, व्याकरणाचे खूप प्रश्न विचारणं, त्यांना अगदी वैताग येईल असे प्रश्न विचारणं, त्यांच्या कपड्यांवर शाईचे डाग पडण्याचे प्रयत्न करणं, ते वर्गात येण्यापूर्वी त्यांच्या खुर्चीवर खाजवणारी काउसकुल्ली ठेवणं, खुर्चीच्या फटीत काटे ठेवणं ,त्यांना शिकवताना मध्ये-मध्ये त्रास देणं असे अनेक प्रकार सुरु केले. हे असं कित्येक दिवस सुरु होतं. आता या प्रकरणाचा शेवट काय झाला? जे आठवतंय त्यानुसार आमच्या आवडत्या सरांना आमची अडचण सांगितली, आणि त्यांनी आम्हाला चांगलंच खडसाऊन आमचं कसं चुकतंय ते सांगितलं. ते आम्हाला पटलं कि नाही हे महत्वाच नव्हतं, ते आमच्या आवडत्या सरांनी सांगितलं होतं ते महत्वाचं होतं. मग अभ्यासात आम्ही इतके बुडून गेलो कि 'त्या' सगळ्या गोष्टी हळूहळू डोक्यातून निघून गेल्या.

Thursday, November 19, 2009

सौंदर्य

एक संध्याकाळ. पावसानं भरलेल्या काळ्या ढगांनी दाटून आलेली. हवेत गारवा. माणसांनी , खड्ड्यांनी भरून गेलेले रस्ते, तरी त्याचा त्रास होऊ न देणारी, एक सावळी संध्याकाळ. मोठया टपोऱ्या थेंबांनी न्हाऊन गेलेली, एक संध्याकाळ. एक रात्र. कोसळणाऱ्या पावसाची, सोसाटयाच्या वाऱ्याची, बाकी सगळी शांतता. भीती वाटायला लावणारी. संपूर्ण भिजून, थिजून गेलेली, एक रात्र. एक सकाळ. रात्रभर पडलेल्या पावसानंतर, नाहणं झाल्यानंतर सुंदर दिसणाऱ्या नववधुसारखी. वाळलेलं, भिजलेलं गवत. त्यावर पडलेली सूर्याची सोनेरी किरणं. किरणांमुळं गवतावरचे चमकणारे पाण्याचे थेंब. म्हणजे जणू चांदीचं नक्षीकाम असलेली पिवळसर साडी नेसलेली एक सकाळ. सूर्याच्या किरणांमध्ये प्रसन्न, निर्मळ, स्वच्छ वाटणारी, एक सकाळ. दररोज दिसणाऱ्या निसर्गाची ही विविध रूपं. भावलेली. कुणीतरी म्हणालं होतं, 'निसर्ग म्हणजे सौंदर्य'. अनुभवायला मिळालं. पुन्हा एकदा.

Wednesday, November 11, 2009

लंपन भेटला

संध्याकाळची वेळ. अवेळी पडत असलेला पाऊस, रस्त्यांवरचे खड्डे, खड्ड्यात साठलेले गढूळ पाणी, वाहनांची गर्दी, वाहनानंमुळे अंगावर उडत असलेला चिखल, चिखलामुळे खराब होत असलेले कपडे. कटकट . आता बस stop वर थांबायचं, बसची वाट बघायची, बस मधली गर्दी, धक्काबुक्की... असं बरंच काही-बाही आठवायला लागलं. वैताग वाटायला लागला. कपाळावर नकळत आठ्यांचं जालं पसरायला लागलं. बस stop थोड्या चढतीवर होता. थोड्या अंतरावर शाळा होती. बस येईपर्यंत येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पाहण्याखेरीज दुसरं काही काम नव्हतं. इतक्यात तो दिसला. पाहता क्षणी याला कुठंतरी भेटलीय असं वाटलं. कोण बरं हा? मग नीट निरखून पाहिलं त्याला. दहा बारा वर्षांचा तो सावळासा चिमुरडा. अंगानं बारीकच. डोक्यावर अगदी बारीक केस. पाठीवर भलं मोठं दप्तर. त्याच्या ओझ्यानं बिचारा चांगलाच वाकला होता. सायकल चालवत होता, म्हणजे तसा प्रयत्न करत होता. एकाच पायानं एका बाजूचं प्याडल दोन तीनदा मारत तोल सावरत, बाहेर काढलेली जीभ दातात थोडीशी चावत, जोर लावून, कशीबशी त्यानं सायकलवर ढेंग टाकली. सायकल थोडीशी लडबडली. पण त्यानं सावरलं.चेहरा निरागस. पण तो थोडासा गोंधळलेला दिसत होता, वाहनांची गर्दी असल्यानं असेल कदाचित. आपले सगळे मित्र पुढे जाताहेत, आपण मात्र मागे पडलो असंही वाटत असेल त्याला कदाचित. थोडा पुढे आल्यानंतर त्याची माझी नजरानजर झाली. मी त्याला पाहून ओळख असल्यासारखी हसले. तो अजूनच गोंधळला. आपण ओळखतो का हिला, असा त्याला प्रश्न पडला असावा, ते त्याला पडलेल्या आठीवरून मला कळलं. हो. मी भेटले होते त्याला! प्रकाश नारायण संतांच्या 'पंखा', 'झुंबर' आणि 'वनवास' मध्ये. लंपन. वाचत असताना लंपनचं जे चित्र मनात तयार झालं होतं तेच जणू मूर्त होऊन समोर आलं होतं. लंपनपेक्षा थोडासा मोठा असेल कदाचित पण मला माझा लंपन भेटला. ओळखीचं कुणी भेटलं कि जो आनंद होतो तोच झाला, आणि सगळा वैताग पळून गेला. सगळ्या आठ्या गायब...

Monday, November 9, 2009

मराठी भाषा टिकणार...

मराठी भाषा टिकणार...मराठी माणूस टिकणार... यासाठी काय करायचं? सोप्पं आहे... दुसरी कुठलीही भाषा महाराष्ट्रात बोलू द्यायची नाही। मराठी माणसाव्यतिरिक्त इतर कुणाचचं कौतुक करायचं नाही, आपलं म्हणायचं नाही. म्हणालं तर तुम्हाला मराठीचा अभिमान नाही. हिंदी सिनेमे बघायचे नाहीत, हिंदी मालिका बघायच्या नाहीत,हिंदी गाणी ऐकायची नाहीत, 'जय हो' म्हणत खूष व्हायचं नाही, रवींद्रनाथ टागोरांबद्दल अभिमान वाटू द्यायचा नाही, भगत सिंग मराठी नव्हते ना मग त्यांचा विचार करायचा नाही, आशा-लता यांनी मराठी किती गाणी गायली यावरून त्यांना थोर म्हणायचे, कोण गुलझार, कोण ए. आर. रहमान, कोण पी टी उषा, कोण बिंद्रा, कोण किरण बेदी, आम्हाला फक्त सचिन आणि सुनील माहित आहेत, ते खेळतात तेच काय ते क्रिकेट, कशाला ताज महालचं कौतुक करायचं, कुठलं हळेबिड आणि कुठलं हंपी? मराठी भाषा टिकणार...मराठी माणूस टिकणार.... आम्ही मराठी किती बोलतो, कसं बोलतो, आम्ही मराठी किती वाचतो, शाळेत मराठीच्या नावानं काय शिकवलं जातं, कसं शिकवलं जातं, याकडे लक्ष द्यायचं नाही, याचा विचार आपण करायचं नाही. याचा विचार केला आधी बाळासाहेब ठाकरेंनी, आणि आता तो करत आहेत राज ठाकरे... .मनसे...दिलसे...हाथसे...लाथसे...

Friday, November 6, 2009

college life

कॉलेजचे दिवस म्हणजे धमाल, कॉलेजचे दिवस म्हणजे सोनेरी दिवस, कॉलेजचे आयुष्य म्हणजे फुलपाखरांचे दिवस....असं बरंच काही-बाही ऐकलं होतं. फार उत्साहानं जेव्हा कॉलेजमध्ये गेले, पण घेतलं science, मग इंग्रजीतून अभ्यास, एक-एक तासाची सलग लेक्चर, दोन-दोन तास चालणारी practicals, मुला-मुलींचे ग्रुप, चांगले मार्क मिळवायचं टेन्शन.... या सगळ्या दडपणात फुलपाखरू कधी कोमेजून गेलं, कळलंच नाही. शिस्तीचे असले तरीही शाळेचे दिवस चांगले असं वाटायला लागलं. मग कोणीतरी म्हणालं, अकरावी-बारावी म्हणजे असंच. खर कॉलेज म्हणजे पुढची तीन वर्षे. मग पुन्हा कॉलेजच्या सुंदर दिवसांची स्वप्नं पडायला लागली. पण नंतर सगळी गणितंच चुकली. काही कारणांमुळे पदवीच शिक्षण मुक्त विद्यापीठातून पूर्ण करावं लागलं. तिथं फक्त रविवारीच कॉलेज. तिथलं सगळचं वेगळं. लग्न झालेल्या, शिक्षण अर्धवट सोडलेल्या, बढतीसाठी नोकरी करत-करत शिकणाऱ्या बायका आणि मुली. तिथले दिवस म्हणजे 'वासरात लंगडी गाय शहाणी'. तेही दिवस गेले. नंतर post-graduation पुण्यात. आधी जे ठरवलं होतं त्या पेक्षा काहीतरी वेगळंच. घरात आजपर्यंत कुणी ही ऐकलं नव्हतं असं क्षेत्र, journalism चं. इकडे मात्र कॉलेजच्या दिवसांविषयी जे ऐकलं होतं ते सगळं अनुभवायला मिळालं. एक भन्नाट ग्रुप, कॅन्टीन मधला चहा वर चहा, कधी फालतू गप्पा तर कधी सिरिअस चर्चा, लायब्ररीतला time-pass, नाटकं-सिनेमे, पुरस्कार सोहळे असे काही-बाही कार्यक्रम, अफलातून gathering ,लहान-मोठ्या ट्रिप्स,आमचे वाद, आमचे संवाद, हसून हसून, तर कधी भांडणातून डोळ्यात आलेलं पाणी, परीक्षेसाठी नोट्सचा गोंधळ.....सगळंच ... .पुन्हा सिद्ध करणारं..college life खरचं सुंदर असतं...परत न येणारं .

Thursday, November 5, 2009

काही जपलेली नाती

बदलत्या जीवन शैलीनुसार रक्ताच्या नात्यांचं स्वरूप बदललंय, तिथं ओळखीच्या नात्यांची काय कथा? पण अशा परिस्थितीतही काही ठिकाणी मात्र अशी नाती जपली जातात, त्यापैकी एक घर. या घरात, सकाळी कामाच्या गडबडीत येणाऱ्या 'दुधवाल्या मामांना' आठवणीनं चहा दिला जातो. त्याचं खरं नाव काहीही असो त्या घरासाठी ते 'मामा' चं असतात, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. ते ही अगदी आपलेपणानं त्या घरात येऊन पेपर वाचून चहा घेऊनच जातात. कधी तरी चहाला उशीर झाला तर ते स्वतः न लाजता चहा मागतात. आजही त्या घरात पोस्टमनला चहा-पाणी आवर्जून विचारलं जातं. दिवाळीला 'दिवाळीच्या पोच' सोबत थोडा फराळही दिला जातो. सरकारी सर्व्हेसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरात बोलावून आपलेपणानं माहिती दिली जाते, सोबत चहा असतोच. सध्याच्या निवडणुकीसाठी ओळखपत्र काढायला आलेल्या अधिकाऱ्यांनी त्या घरात बसूनच इतर घरांचीही माहिती घेतली. दारावर येणाऱ्या सेल्समनला पाणी विचारून काहीही घेणार नाही, त्यामुळं काहीही दाखवू नकोस, असं शांतपणे प्रसंगी चिडून सांगितलं जातं. महिन्याला येणारा 'केबलवाला' आला कि पंधरा-वीस मिनिटं बसून बोलूनच जातो. सकाळी येणाऱ्या 'पेपरवाल्या पोऱ्याशी' एका हास्याचं नातं. शिवाय सोसायटीतला 'भाजीवाला मामू' आणि 'गिरणवाला काका' हि सुद्धा, खरी नावं माहित नसलेली, पण जपली गेलेली नाती.या नात्यांसोबत शेजारधर्म आहेच. शेजारी असणारी पाच कुटुंबं म्हणजे जणू घरचेच सदस्य. दिवसातून एक चहा तरी सोबत होतोच, कोणत्या तरी एका घरात. भाज्या खुडणं, धान्य निवडणं, घरच्या गप्पा-गोष्टी, चेष्टा-विनोद, रुसवे-फुगवे, वाद-भांडणं हेही आहेच, त्या जपलेल्या नात्यांमध्ये. सगळं काही गोडगोड नसतं. वादाचे, कडवटपणाचेही काही प्रसंग असतात पण दुर्मिळ होत असलेली ही नाती इथं मात्र जपलेली आहेत. आताच्या काळातला कदाचित हा मूर्खपणा असू शकेल.

Wednesday, November 4, 2009

प्रवास

बस नंबर २१७५. भवानी मंडप ते शिवाजी विद्यापीठ. वेळ सकाळी ७.४०. प्रवासाचा एकूण वेळ २० मिनिटं. सगळे प्रवासी ठरलेलेच. बसचा ड्रायव्हरही ठरलेलाच. पन्नाशीच्या पुढचा. दाढीचे लालसर झालेले केस, मिशा नाहीतच, डोक्यावर काळ्या रंगाची विणलेली गोल टोपी, समोरच्या दातांमध्ये फट, हसरा आणि शांत चेहरा. कंडक्टर ठरलेला नसतो. तर या ड्रायव्हरमुळे सकाळची वीस मिनिटं अगदी मजेत जातात. तो त्याच्या आवडीची जुनी गाणी बसमध्ये लावतो. त्या गाण्यांमुळे सकाळची ती वीस मिनिटं अगदी संगीतमय होऊन जातात. दिवसाची सुरवात प्रसन्नपणे होते. रफी, मुकेश, किशोर, लता-आशा यांची सोबत असलेली एक आनंदयात्राच जणू. आजची सकाळ तर 'रफी स्पेशल' होती. 'शराबी आंखे', 'मेरी मेहबूबा', 'एहसान तेरा', 'बदन पे सितारे' अशी एक से एक सही गाणी ऐकल्यानंतर बस मधून उतरावं, असं तरी वाटेल का कुणाला?

Monday, November 2, 2009

वेगळं हिंदी

हिंदी मालिकांविषयी अनेकदा अनेकजण अनेक गोष्टी बोलत असतात. अशांपैकी मी हि एक. एकता कपूर संपली, बालाजीचा आशीर्वाद किमान आता तरी तिला मिळेनासा झाला आहे, त्यामुळे ती त्रस्त असेलच. जाऊदे, त्याची चर्चा इथे नको. तर, एकता संपली असली तरी सास- बहु संपल्या नाहीत, पण त्याचं स्वरूप बदललं आहे. म्हणजे त्यांचे कट कारस्थान अजून ही सुरु आहेच, ते कसे संपेल, त्यावरच तर टीवीवाल्यांचे TRP शिजतात. तर, आता सास-बहु फक्त शहरातल्या आणि गुजराती किंवा बंगाली राहिल्या नाहीत. आता त्या ग्रामीण (पण श्रीमंतच) भागातल्या आहेत. त्या आहेत बिहारी, हरयाणवी, राजस्तानी आणि मराठी सुद्धा. त्यामुळे आता खास भोजपुरी, हरयाणवी, मराठी टच असलेली हिंदी ऐकायला मिळते. त्यामुळे कानाला थोडं बरं वाटत. झी वरच्या 'अगले जनम मोहे बिटीयाही कीजो' मालिकेत भोजपुरी style चं हिंदी ऐकायला मिळतं. तिथल्या प्रथांविषयी, आणि बाकी मसाला तोच. पण सगळेच कलाकार भोजपुरी हिंदी मस्त बोलतात. 'ना आणा इस देस मेरी लाडो' स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधातली हरयानवी style ची मालिका. यात 'अम्माजी'चं काम करणारी अभिनेत्री भारीच (हरयानवी) हिंदी बोलते. 'क्योंकी' ची छुट्टी करणाऱ्या 'बालिका वधू' मधलं राजस्तानी बिंद-बिन्दनि वेगळं वाटतं. यातली 'दादीसा' उत्तमच. 'छोटी बहु' मधले बाउजी जेव्हा 'अपराधी को उचित दंड मिलना स्वाभाविक हैं, अतः मैं अपना कार्य अवश्यहि करुंगा' असे म्हणत रागावले तरी कानात साखर घोळल्यासारखंच वाटतं. या मालिका खूप भन्नाट आहेत किंवा अर्थपूर्ण आहेत असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. या मालिकांमधून वेगळ ( रुळलेलं नव्हे ) हिंदी ऐकायला मिळतं इतकच वाटतं. आणि ते हि बरोबरच असेल या बद्दलही शंका आहेच. पण तरीही....

Saturday, October 31, 2009

वाक्प्रचार

काल वडिलांकडून (माझ्यासाठी नवा, त्यांच्यासाठी जुनाच असलेला) वाक्यप्रचार समजला। "दुखऱ्या खांडकाला बांधण्यासारखा" ग्रामीण भागात खांडुक म्हणजे जखम. तर या वाक्याप्रचाराचा अर्थ असा कि तो इतका गुणवान आहे कि जखमेला बांधला कि जखम बरी होईल, गुणकारी औषधासारखा.

Friday, October 30, 2009

जग

त्याची नातं. दोन तीन वर्षांची. अगदी बारीक, अशक्त वाटण्या इतकी. त्याच्या छातीशी पेंगाळलेली. नाकातून थोडासा शेंबूड बाहेर आला होता. त्याची तिला फिकीर नव्हती. अंगात पिवळ्या रंगाचा फ्रॉक होता. तिचा आजोबा. म्हातारा. डोक्यावरचे केस तांबूस पांढरे. पान खाऊन तोंड रंगलेले. दात काही पडलेले. डोळे लाल.चेहरा उन्हामुळ रापलेला. हसला कि भेसूर दिसायचा. भीती वाटायची. पण तो आपल्या झोपाळलेल्या लाडक्या नातीला बस मधून बाहेरच जग दाखवत होता.कौतुकानं. शाळेला जाण्याऱ्या मुली, गाडया, दुकानं....

Monday, October 26, 2009

अस्वस्थ

ती माझ्या मैत्रिणीची आई. बघताक्षणी शामच्या आईची आठवण करून देणारी। शांत, प्रेमळ आई. मुलांची काळजी घेणारी. रात्रंदिवस कष्ट करणारी तरीही हसत असणारी, आई. पण मला त्यांच्याकडे बघितलं कि त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेची एक लकेर दिसते. त्यांच्या मनात काहीतरी धुमसतंय असं वाटतं. मनात कुठतरी निराशा, अशांतता आहे असं वाटतं. त्यांना कधी कशाची तक्रार करताना मी पाहिलेलं नाही, 'टिपिकल' बाय्कांसारख 'गॉसिप' करतानाही मी त्यांना पाहिलेलं नाही. पण तरीही त्यांना खूप ओरडून काहीतरी सांगायचं आहे, असं वाटतं. खूप सोसाल्याच्या वेदना त्यांच्या डोळ्यातून अनेकदा व्यक्त होतात. हे सगळे माझ्या मनाचे खेळही असतील कदाचित....पण असं वाटतं खरं. कधी कधी त्यांच्याशी खूप बोलावं, त्यांचं खूप ऐकावं असं वाटतं, पण आमचं वय, नातं आड येत असावं.

एक ठिकाण

कोल्हापूर पासून ४५-५० किमी. अंतरावरच एक ठिकाण. अगदी छोटसं गाव. फार-फार तर २५०० लोकसंखेच. (हा आपला अंदाज) हिरव्यागार झाडीत वसलेलं. लाल मातीची सुंदर दिसणारी घरं. प्रत्येक घरासमोर अंगण, समोर झाडीच कुंपण. त्यावर वाळत घातलेले कपडे. सगळंच कसं चित्रासारखं. सुंदर निसर्गचित्र. रस्ता डांबरी पण नावालाच, खड्ड्यांनी भरलेला. या गावात एका टोकाला राम मंदिर आहे. फार प्राचीन असं म्हणतात. सध्या एक खाजगी आश्रम, श्रद्धास्थान, सर्वांसाठी विना मोबदला खुलं असणारं ठिकाण. वरून पाहिलं कि हिरव्यागार झाडीनं झाकलेले उंच डोंगर. जश्या पायऱ्या उतरून जावं तसा पाण्याचा खळखलाट ऐकू येतो. थोडंस खाली गेलं कि मग दिसतात, ओबड धोबड दगड आणि नितळ, स्वच्छ , निर्मळ पाणी. मन प्रसन्न करणारं. त्यावर पाय ठेवला तर ती पातळ काच फुटून जाईल असं वाटणारं. संपूर्ण दगड खोदून ध्यानाला तयार केलेली जागा. अंधारलेली. (हे प्राचीन असावं, आता कोणी त्याचा वापर करत नसावं, हा हि अंदाज) असे तीन दगड. एका कोपऱ्यात शेवाळलेल्या दगडांच्या गुहेत शंकराची पिंड. तिथं गेलं कि वरून पाणी ठिबकत असतं. तर दुसरीकडे दोन मोठ्या दगडांच्या चिमटीतून पडणारं पाणी, थंडगार. पूर्ण भिजून जावं, असं वाटणारं. स्वच्छ पाणी आणि त्याच्या सहवासात गुळगुळीत झालेले काळे दगड. पुन्हा चित्रासारखं. तसा आम्हाला तिथं कुठ आश्रम किंवा राम मंदिर दिसलं नाही. पण त्याची फिकीर नव्हती. एकाच नजरेत सामावणारं ते ठिकाण, 'पर्यटन स्थळ' नसल्यानं अजून तरी खूप छान, स्वच्छ, मनाला स्पर्श करणारं आहे. खऱ्या निसर्गाचं खरं दर्शन घडवणारं.

Wednesday, October 14, 2009

काही माणसं...काही नाती..

काही माणसं...काही नाती...जुनीच...तरीही नव्यानं कळलेली... काही माणसं...काही नाती...अचानक...नव्या वळणावर...नव्यानं सापडलेली... पूर्वीपेक्षा...अधिक खोल आणि अधिक व्यापक झालेली....

Thursday, October 8, 2009

घाण

बस मधून जाताना दररोज दिसणारे चित्र. काही वेळा ठिकाण बदलत पण चित्र तेच. नाकाला रुमाल लावल्याखेरीज पुढे जाता येणार नाही असे कचऱ्याचे ढीग. प्लास्टिकच्या रंगीत पिशव्या, फळांच्या साली, आणि बरंच ओळखू न येणारा, कुजलेला, सडलेला कचरा, सोबत घाण वास.आणि सकाळी सकाळी हा कचरा उचलायला येणारी महानगरपालिकेची गाडी, सोबत काही 'माणसं'. दोन-तीन. या कचऱ्याच्या ढिगात उतरून, तो ढीग उपसणारी. अंगावर (नावालाच) मळकट कपडे, डोक्यावर फाटकी टोपी, बाकी विशेष काहीच नाही. त्यांच्या तोंडाला रुमाल कधीच दिसला नाही. त्यांना घाण वास येत नसेल? बघून मन सुन्न होतं. घाणीत उतरलेली ती मानसं बघून त्यांचीहि घाण वाटायला लागते. मग त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल,त्यांना असं बघून. नकोसा वाटतो असला विचार. मग ठरवून या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून बस मधली गाणी ऐकण्यात मन गुंतवावेसे वाटते.पण त्याचीही रुखरुख वाटायला लागते.

Tuesday, October 6, 2009

तो आणि ती

दोन-तीन महाविद्यालयांच्या मधला bus stop म्हणजे एक मजेशीर ठिकाण. निरीक्षण करता येइल, वेळ छान घालवता येईल अस ठिकाण.तरुण मुला-मुलींची भरपूर गर्दी,हास्याचा धबधबा,उत्साहाचा खळाळता समुद्र,चैतन्याने भरलेलं वातावरण असणारं ठिकाण.bus stop. सगळीकडे थोडेसे गोंधळलेले,काहीसे स्टायलिश,थोडेसे फिल्मी,सतत एकमेकांना टाळ्या देत बोलणारे,खिदळणारे जीव. फुललेले. या गर्दीपासून थोड्या अंतरावर,सगळ्यांपासून दूर उभे असलेले....तो आणि ती. दोघांच्याही चेहऱ्यावर तारुण्याच्या सगळ्या खाणाखुणा.उंचीला साधारण सारखेच.कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये.दोघांमध्ये सुरक्षित अंतर,जाणवेल असे. दोघेही निरागस. ती थोडीशी बावरलेली।पाठीवरच्या sack च्या पुढे आलेल्या पट्ट्याशी खेळणारी. तो तिच्या कडे न पाहता,इतरत्र बघत,हातातल्या (कदाचित नव्या असलेल्या) घड्याळाशी खेळणारा. हसत,लाजत कधी एकमेकांकडे तर कधी सभोवताली नजर टाकत बोलणारे... तो आणि ती. जगाला विसरून एकमेकांशी बोलण्यात मग्न असलेले...तो आणि ती.

Monday, October 5, 2009

एक रात्र अशीही..

मित्र-मैत्रीनि सोबत एक रात्र, स्वप्नातली।बाहेर जेवण, नऊ ते बारा पिक्चर,नंतर चालत सारस बागे जवळ मस्त गरमागरम कॉफी,ती ही दोन कप.गरम कॉफी बरोबर गरम विषय,चर्चा तर कधी वाद.रात्रीचा गार वारा,ढगाळ आभाळ , धूसर दिसणारा चंद्र, शांत आणि ओले रस्ते, बंद दुकानं आणि आमच्या गप्पा. कधी येणारी डुलकी.एकमेकांची घेतलेली काळजी.संपता न संपणारे विषय.कधी काही गंभीर तर कधी चेष्टा,कधी भूतकाळातल्या आठवणी तर कधी भविष्याच्या गोष्टी. कधी हि न बोललेले विषय, न उलगडलेली मने, सगळ मोकळ करणारी रात्र. संपत आलेली पण तरीही बरच बोलायचं राहून गेलेली रात्र.

आठवण

तेंडूलकरच 'तें दिवस' वाचून आमची कॉलनी आठवण थोडस स्वाभाविक होत.

आमची कॉलनी. चार मोठ्या घरांच्या तीन रांगा,अशी एकून बारा घर.सगळी 'सायबांची'.पंचायत समितीमध्ये काम करणारे साहेब.सगळे साहेब कामाला गेले कि कॉलनीत आम्हा मुलांचे आणि बायकांचेच राज्य. सायबांच्या बायका. मध्यमवर्गीय,काही कमी शिकलेल्या,काही अजिबात न शिकलेल्या,नवरयाच्या नोकरीत आणि मुलांच्या मार्कांमध्ये सुख शोधणाऱ्या बायका. भाज्या खुडायला,धान्य निवडायला,लहान-सहान सण साजरे करायला आणि सल्ले मागायला-द्यायला नेहमी एकत्र. नवा पदार्थ बनवला तर सगळ्या घरांमध्ये देणाऱ्या. संध्याकाळी मात्र नवरा घरात आला कि घरातून बाहेर न पडणाऱ्या.'सुखी 'बायका.

आम्ही मुल.शाळेत नाहीतर कॉलनीत रस्त्यांवर खेळात मग्न.शाळा घरापासून हाकेच्या अंतरावर.शाळेत प्यायचं पाणी संपल कि आम्ही कॉलनीत पाणी प्यायला यायचो,इतक्या जवळ शाळा.म्हणून आम्ही खऱ्या अर्थान कॉलनितच असायचो.दिवसभर. प्रशस्त जागा असल्यान आम्ही खूप खेळायचो.विष-अमृत,वक्वास,लपंडाव,पळापळी,लगडीपळती,घर आखून जिबलीन, क्वचित कधीतरी क्रिकेट(मुलीना एक दोन बॉलमध्ये औट करून फिल्डिंग करायला लावलं जायचं) यातून वेळ मिळाला कि जेवण-पाव्हण खेळायचो,मुल-मुली मिळून.('भातुकली' हा शब्द खूप नंतर कळाला) बैठे खेळ अजून वेगळे.इतक खेळून अभ्यास करून चांगलेच मार्क मिळवावे लागायचे, कारण सायबांच्या मुलांना कमी मार्क असण,हा खूप मोठा गुन्हा होता. आणि नापास होण तर......

Thursday, October 1, 2009

ग्रंथ

ग्रंथ हेची संत । मानी बुद्धिवंत । दोहो मधे अंत । अज्ञानाचा । ग्रंथलयी जाता । चित्त शांत होई । लाभतो एकांत । भेटतो भगवंत । नुकात्याच वाचनात आलेल्या आणि भावलेल्या या ओळी

Thursday, September 24, 2009

आख़िर क्यो ?

''जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम वो फिर नही आते ,वो फिर नही आते।'' फ़िर क्यो लोग ये भूल जाते है?क्यो हमेशा आज में कल की बाते करते है ? मैंने ये किया। था। मैंने वो किया था । मेरी क्या शान थी। कितना खुशकिस्मत था । मैं कितना बदकिस्मत था। मैं कैसे बदनाम था। मैं कैसे गुमनाम था। मेरे साथ ऐसा हुआ था। मेरे साथ वैसा हुआ था। क्यो इस 'था-थी' के आस-पास ही हम घूमते रहते मेरी?क्यो हम आज का पल बीते हुए कल के बारे में सोचकर बोलकर बिताते है । क्यो आज पर कल का साया सा होता है ? आनेवाला पल अगर जानेवाला है तो क्यो हम ख़ुद को उस पल में बाँधकर रखते है? आख़िर क्यो?

Monday, September 21, 2009

दोष कुणाचा?

मामू.आमच्या सोसायटीचा भाजीवाला.४०-४५ वयाचा मुसलमान गृहस्थ.तो थेट मुख्य भाजी मार्केट मधून भाजी आणायचा ,त्यामुळ तो त्याची भाजी इतरांपेक्षा स्वस्तात विकू शकायाचा .त्याला तस करण परवडतही .स्वस्तात भाजी देणारा म्हणुन सोसायटीतल्या बायकांशी त्याच खास नात निर्माण झाल .दररोज बायका त्याची वाट बघत बसायच्या .मामून प्रत्येक बाईशी बहिणीच, वहिनीच,मावशीच नात तयार केल होत.नात...माणुसकीच. एके संध्याकाली मामू नेहमीप्रमाण भाजी विकत होता.अचानक कुठून तरी तीन bikes वरून 'शिवाजी महाराज की जय' म्हणत काही तरुण आले आणि मामुची सगळी भाजी विस्कटून टाकली. ही घटना मिरज दंगली नंतर पाच दिवसांनंतरची ,कोल्हापुरात घडलेली। ***** स्नेहल .इंचलकरंजी त राहणारी .न चुकता collegeला येणारी .खुप अभ्यासू .चौकस .काल भेटली .उदास दिसली ,म्हणुन सहज विचारल ,तर म्हणाली ,''ह्या दंगलीनमुळ दहा दिवस संचार बंदी. college बंद .बाहेर फिरण बंद .अभ्यास बंद .इतर चर्चा बंद .मित्र -मैत्रिनिशी बोलन बंद. जणू जगणच बंद.दंगल झाली मिरजेत,मग त्याचा त्रास मला, माझ्यासारख्या सामान्यना का ? आमचा काय दोष ?'' खरच दोष कुणाचा ?

Thursday, September 10, 2009

मिरज दंगल

एक प्रार्थना,एक प्रश्न जो आपण आज विसरत चाललोय :
ईश्वर अल्ला तेरे जहाँ में ,
नफरत क्यों है,जंग है क्यों,
तेरा दिल तो इतना बड़ा है,
इंसान का दिल तंग है क्यों.

Wednesday, September 9, 2009

पहिलाच प्रयत्न .बघू हा उत्साह किती दिवस टिकतो! पण काही मित्र मैत्रिनिंचाआग्रह म्हणुन हा खटाटोप. इतके सुंदर blogs आहेत,तितका सुंदर नसेना पण स्वताशी संवाद साधता येईल, असा एक platform असावा अस वाटल, त्यातून केलेला हा प्रयत्न.

About Me

My photo
short tempered,talkative.love to watch tv.